काँग्रेस प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे उद्या मुंबई दौ-यावर

काँग्रेस प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे उद्या मुंबई दौ-यावर

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल, आ. संपत कुमार, आशिष दुआ उद्या रविवारी मुंबईच्या दोन दिवसाच्या दौ-यावर येत आहेत.

महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे. सकाळी ते टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई येथे होणा-या प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरु केलेल्या प्रोजेक्ट शक्तीचे उद्घाटन खर्गे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रभारी श्रीमती सोनल पटेल, आ. संपत कुमार, आशिष दुआ, देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार पदाधिकारी उपस्थित असतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

Previous article१६ जुलै पासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही
Next articleतब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”