दूध आंदोलकांवर दरोडेखोरांचे कलम लागणार नाही!

दूध आंदोलकांवर दरोडेखोरांचे कलम लागणार नाही!

विरोधी पक्षनेते विखे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर : दूध दरावरून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनातील दूध उत्पादकांवर दरोडेखोरांना लावले जाणारे १५१ (३) हे कलम लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे.

विखे पाटील यांनी बुधवारी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. यावेळी ते म्हणाले की, दुधाला रास्त भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी शांततापूर्ण पध्दतीने आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर बळाचा वापर करते आहे. अशा आंदोलनांमध्ये निदर्शकांवर साधारणतः १५१ (१) हे कलम लावले जाते. परंतु, दूध आंदोलकांवर दरोडेखोर किंवा चोरांसाठी वापरले जाणारे स्थानबद्धतेचे १५१ (३) हे कलम लावले जात आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांवरील दडपशाही असल्याने सरकारने याबाबत तातडीने निवेदन करावे, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केले की,कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर हे कलम लावले जाणार नाही. या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घेतले जातील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.

Previous article“सब प्रभू की लिला है” : मुख्यमंत्री
Next articleमाणिकराव ठाकरे यांनी दिला उपसभापतीपदाचा राजीनामा