मनेका गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे : मुनगंटीवार यांचा पलटवार
मुंबई:अवनी वाघिणीच्या मृत्युनंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून आरोपांचे फटाके फुटत आहेत. केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी अवनीच्या मृत्युप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पदावरुन हटवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रतिहल्ला चढवत कुपोषित बालकांच्या मृत्युप्रकरणी आधी मनेका यांनी राजीनामा द्यावा आणि मग माझ्या राजीनाम्याची मागणी तरावी, असे म्हटले आहे.
मनेका गांधी या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. देशात कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढले आहे. याची जबाबदारी स्वीकारुन अगोदर त्यांनी राजीनामा द्यावा, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.पंतप्रधान ज्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझ्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील, असे सांगत मनेका गांधींना आपला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही अप्रत्यक्षपणे सुचवले.