मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकहिताचा विचार करून, मुंबई बँकेने सुरू केलेली गृहनिर्माण स्वयं-पुनर्विकास योजना ही आता गतीमान लोकचळवळ झाली आहे. गेल्या वर्षभरात ८०० संस्थांनी या योजनेत सहभागी झाल्या आहेत. दिवसेंदिवस या चळवळीची व्याप्ती वाढत आहे. तर राज्य सरकार सुद्धा गृहनिर्माण संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असे प्रतिपादन मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
मुंबई हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या शारदाश्रम शाळेत, गृहनिर्माण संस्थांसाठी एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. त्याचे उद्घाटन आमदार प्रवीण दरेकर यांच्याहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास बँकेचे जेष्ठ संचालक व सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, विठ्ठल भोसले, जयश्री पांचाळ, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव डी एस वडेर, वसंतराव शिंदे, यशवंत किल्लेदार, हेमंत दळवी यासह सर्व सण संचालक, तसेच सुमारे ५०० गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वयं पुनर्विकास चळवळीला लवकरच राजश्रय मिळणार असल्याचे जाहीर केले. पुनर्विकास करताना, जमीन तुमची, इमारत तुमची, तरीही बिल्डरच्या दारात लाचारी घेऊन जावे लागते. शिवाय बिल्डर मूळ रहिवाशांना एकाद्या कोपऱ्यात जागा देऊन दर्शनी विक्रीसाठी टॉवर बांधतात प्रचंड नफा कमवतात. हाच नफा आणि वाढीव क्षेत्रफळ सर्व रहिवाशाना समान वाटून देणारी, सामान्य माणसाला स्वाभिमान मिळवून, मोठा आर्थिक लाभ मिळवून देणारी स्वयं पुनर्विकास योजना मुंबई बँकेने राबीवली आहे, असे आ. दरेकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या योजनेला राजश्रय मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे नुकतेच एक सादरीकरण आम्ही केले आहे. तसेच स्वयं पुनर्विकासाला जाणाऱ्या इमारतींना प्रोत्साहनपर एफएसआय मिळावा, सोसायटीच्या प्रकल्प कर्जामध्ये व्याजावर अनुदान मिळावे आणि एकखिडकी योजनेद्वारे निश्चित कालावधीत सर्व परवानग्या मिळाव्यात, अशा मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.