सर्जिकल स्ट्राईक करून भाजपला तडीपार करा : खा. अशोक चव्हाण  

मुंबई नगरी टीम

गडचिरोली : भाजपच्या हुकुमशाही आणि लोकविरोधी कारभाराला जनता त्रस्त झाली आहे. या देशाला पुन्हा विकासाच्या वाटेवर न्यायचे असेल तर आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना तडीपार करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

गडचिरोली येथील जनसंघर्ष यात्रेच्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय समस्यांपासून गडचिरोलीतील स्थानिक समस्यांपर्यंत भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. ते म्हणाले की, या सरकारने सातत्याने आदिवासींवर अन्याय केला आहे. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी वनहक्क कायदा केला होता. भाजप सरकारने नेहमीच या कायद्याला तिलांजली दिली आहे. वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. हे उद्योगपती जंगलांचा सफाया करून बहुमुल्य खनिज संपत्तीची लूट करित आहेत. उद्योगाच्या नावाखाली जंगलांचे विद्रूपीकरण करून आदिवासींना देशोधडीला लावण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे. रोजगार नसल्याने कुपोषणाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. बालमृत्यूंची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विकास मंत्रीच “बालके मरत आहेत तर मरू द्या” असे संवेदनशून्य विधान करतात. हे अतिशय संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या काळात सुरु झालेली कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत. देसाईगंज वडसा रेल्वे प्रकल्पही काँग्रेस सरकारने मंजूर केला. त्यासाठी निधी दिला याचाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उल्लेख केला. या सरकारच्या काळात विकासकामे ठप्प असली तरी रेती आणि दारूची तस्करी जोरात सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रग्णालायाच्या वास्तू केवळ शोभेपुरत्या राहिल्या आहेत. यांची घोषणा सबका साथ सबका विकास असली तरी विकास केवळ ठेकेदारांचाच सुरु आहे. सर्वसामान्य जनतेला रेशनिंगवर मिळणारे धान्य, रॉकेलही मिळत नाही. सर्वसामान्य जनता मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करत आहे, सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध दाद मागते आहे, आणि या परिस्थितीत जनतेला न्याय देण्याऐवजी सरकारमध्ये बसलेले लोक कारवाई करण्याची धमकी देत आहेत. हे सरकार उलथवून लावल्याशिवाय सर्वसमान्य जनतेला न्याय मिळणार नसल्याचे सांगून चव्हाण यांनी भाजपावर चौफेर टीका केली. गडचिरोलीचे पालकमंत्री नेहमीच अदृश्य असल्याचे सांगून आता जिल्ह्यात पालकमंत्री दाखवा, हजार मिळवा योजना सुरु करण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था गजनी मधल्या आमीर खान सारखी : मुंडे
Next articleस्वयं- पुनर्विकास योजनेची गतीमान लोकचळवळ : आ. प्रवीण दरेकर