मुंबई नगरी टीम
मुंबई : उत्कृष्ट प्रशासन, सुसूत्रता तसेच जन कल्याणकारी निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे मंत्री कार्यालयाच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा खोवला गेला आहे.
पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास विभागाचा कारभार मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून चालतो. इतर मंत्र्यांच्या तुलनेत या दालनात नेहमीच सर्व सामान्य नागरिकांची मोठी गर्दी असते. पंकजा मुंडे यांनी आलेल्या प्रत्येकांची कामे सुलभरितीने व्हावीत यासाठी स्वतः लक्ष घालून कर्मचा-यांना कामाचे नियोजन करून दिले शिवाय कार्यालयात त्यांनी शिस्तीला अतिशय महत्त्व दिले. कार्यालयात भेटीसाठी आलेल्या अभ्यागतांची नोंद घेण्यापासून ते त्यांच्या कामांचा पाठपुरावा करण्यापर्यंत तसेच वेळेत कामाचा निपटारा करण्याकडे जातीने लक्ष दिले जाते. या कार्यालयाने जनतेच्या कल्याणकारी निर्णयाची व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच सुसूत्रता, सुयोग्य प्रशासन, शिस्त व नीट नेटकेपणा या सर्वच गोष्टींना प्राधान्य दिले आणि याचीच दखल घेवून आयआर क्लास या संस्थेने मंत्री कार्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्रदान केले. आयआरक्यूएस चे प्रमुख शशिनाथ मिश्रा यांच्या स्वाक्षरीचे मानांकन प्रमाणपत्र आज कार्यालयाला प्राप्त झाले.
आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, मंत्री कार्यालयाला मिळालेल्या आयएसओ मानांकनाचे सर्व श्रेय ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आहे. त्यांनी केलेल्या सततच्या मार्गदर्शन आणि नियोजनामुळेच हा बहुमान आम्हाला मिळाला. राज्याच्या कोणत्याही भागातून आलेल्या सर्व सामान्य माणसाला हे कार्यालय आपले वाटावे असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास पंकजा मुंडे यांचे खासगी सचिव मंदार वैद्य यांनी व्यक्त केला.