मुंबई नगरी टीम
जळगाव : मोदी साहेब, तुमचे मंत्री आणि पक्ष कसले पाच वर्षाचे चॅलेंज देताय ? मीच तुम्हाला एक चॅलेंज देतो, पाच वर्षापूर्वीची तुमची भाषणं ऐका आणि हिम्मत असेल तर पुन्हा प्रचारासाठी रस्त्यावर फिरून दाखवा असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज थेट पंतप्रधानांना आव्हान दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दरम्यान सभेत ते बोलत होते.
भाजपाने ‘पाच साल पहले, पाच साल बाद’ दाखवणारा स्तुतीपर एक नवा हॅशटॅग सुरू केला आहे त्याची खिल्ली उडवतांना धनंजय मुंडे यांनी मोदी यांनाच ५ वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या भाषणाची आठवण करून देत मोदीजी तुमचीच भाषणे ऐका आणि जनतेत पुन्हा फिरवून दाखवा असे आव्हान दिले.सोशल मीडियावर मेरा देश बदल रहा है ही भाजपची जाहिरात प्रसिद्ध आहे. पाच राज्यात लागलेल्या निवडणुकांच्या प्रतिकूल निकालानंतर हे गाणं मोदी स्वतः बंद करतील असं वाटलं होतं. यांनी फुशारक्या मारणं थांबवलं नसलं तरी परिवर्तन यात्रेमुळे महाराष्ट्र बदलत आहे, राष्ट्रवादीमय होत आहे हे नक्की असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
या जळगाव जिल्ह्यात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा सत्कार झाला होता, त्यांना दिलेली पैशांची थैली वाजपेयी यांनी पक्षाला दिली होती. सामान्य नागरीकांकडून एक-एक रुपया गोळा करून पक्ष चालवणाऱ्या भाजपाकडे आज निवडणुकांसाठी करोडो रुपये कुठून आले? असा सवाल करत भाजपाच्या मनी संस्कृतीवर टीका केली.
इथले एक मंत्री इन करून, कमरेला पिस्तुल लावून वाघ मारत हिंडतात. आणि दुसरे मंत्री म्हणतात, तुम्ही वाघ मारायची अपेक्षा माझ्याकडून ठेवता, आणि माझं खातं चिमणी मारायचं. जळगावात एक वाघमारा आणि एक चिडीमार मंत्री, कशी होणार प्रगती? असे म्हणत नाव न घेता गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांना चिमटा काढला.