मुंबई नगरी टीम
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ठाकरे चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळेस निर्माते शिवसेना खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक मनसेचे अभिजीत पानसे यांच्यात वाद झाला होता.पानसे आणि कुटुंबियांना बसण्यास जागा मिळाली नाही म्हणून पानसे रागारागाने निघून गेले होते.पण आता या साध्या प्रकरणाला मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्षाचे स्वरूप आले आहे.मनसेने दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यासाठी समर्थनाची मोहीम सुरू केली आहे.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.त्यांनी म्हटले आहे की,बाळासाहेब सामान्य शिवसैनिकालासुद्धा प्रेमाने वागवायचे.त्याचा अपमान करत नसत.हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना सुद्धा कळला नाही. मी जेव्हा अभिजीतशी फोनवर बोललो तेव्हा तो म्हणाला की,मी चित्रपट बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला.बाकी कोणी कसे वागायचे हालज्याच्या त्याच्या संस्कारांचा प्रश्न आहे,असे संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.
ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनीही ट्विट करून शिवसेनेने पानसेंचा वापर पुन्हा करून घेतला,असा आरोप केला आहे.अभिजीत हे लोक तुला फसवणार हे मनसे प्रमुख राज ठाकरे बरोबर बोलले होते,असे जाधव यांनी म्हटले आहे.संजय राऊत यांनीही अभिजीत पानसे यांना चिमटा काढणारे ट्विट केले आहे.लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साठला की संयम आणि कृतज्ञता नष्ट होते,असे त्यांनी म्हटले आहे.ठाकरे उद्या प्रदर्शित होत असून त्याअगोदरच मनसे आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.