मुंबई नगरी टीम
मुंबई: शिवसेना आणि भाजप या सत्तेतील मित्रपक्षांमधील कलगीतुरा जोरदार झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथे काल आम्ही युतीसाठी लाचार नाही.बरोबर आले तर सोबत घेऊ,नाही आले तर शिवाय जिंकू,असे शिवसेनेला सुनावले होते.त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तितकेच सडेतोडउत्तर देताना बाप हा बाप असतो.बाप कसा बदलणार?असे म्हटले आहे.तसेच युती झाली म्हणजे हिंदुत्वाचा विजय झाला का,असा सवाल केला आहे.
राऊत म्हणाले की, हिंदुत्वासाठी युती व्हावी असे मुख्यमंत्री म्हणत आहेत.पण राम मंदिर,समान नागरी कायदा,कलम ३७०,काश्मीर असे अनेक प्रश्न हिंदुत्वाशी संबंधित आहेत.हे प्रश्न सोडवणे म्हणजेही राजकीय हिंदुत्व आहे,असे ते म्हणाले.युती झाली म्हणजे हिंदुत्वाचा विजय झाला का? बाप हा बाप असतो आणि बाप कधी बदलू शकत नाही,असा जोरदार टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.हिंदुत्वाचा खरा कैवारी शिवसेनाच आहे,असे राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावले आहे.
लोकसभेसाठी भाजप शिवसेनेकडे वारंवार आग्रह धरत आहे.शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव धुडकावून लावला असून शिवसेनेने मॅरेज ब्युरो उघडलाय का,असेही राऊत यांनी भाजपला सुनावले होते.त्यामुळे युतीसाठी भाजप लाचार झाला असल्याचे चित्र तयार झाले आहे.