मुंबई नगरी टीम
मुंबई: लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशा राजकीय घडामोडी वेगवान होत चालल्या आहेत.भाजप शिवसेना युती अधांतरी लटकली असताना कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीने मित्रपक्षांसाठी सहा ते सात जागा सोडण्याचा फॉर्म्युला तयार केला असून तसा प्रस्ताव मित्रपक्षांना दिला आहे.यामुळे लवकरच आघाडी अंतिम जागावाटप ठरवून पुढील प्रक्रियेस लागेल,अशी चिन्हे आहेत.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातील तीन तीन जागा मित्रपक्षांना सोडतील,असे समजते.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत २६ आणि २२ जागांचे वाटप झाले आहे.त्यातूनच मित्रपक्षांना जागा देण्यात येणार आहे.यापैकी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ४ जागा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा आणि बहुजन विकास आघाडीसाठी पालघरची जागा सोडण्याचा प्रस्ताव आहे.आंबेडकरांकडे हा प्रस्ताव दिला असल्याचे कळते.आता आंबेडकर यांच्याकडून उत्तराची प्रतीक्षा आघाडीला आहे.
कॉंग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की,प्रकाश आंबेडकर यांच्याशी काल अडीच तास सौहार्द्रपूर्ण वातावरणात चर्चा झाली. आंबेडकरांनी १२ जागांची मागणी केली आहे.याविषयी विचारले असता ठाकरे म्हणाले की,आम्ही दिलेला प्रस्ताव चांगला आहे आणि तो आंबेडकर स्वीकारतील,अशी आशा आहे.प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे १२ लोकसभा जागा मागितल्या होत्या.पण कॉंग्रेसने फक्त एक अकोल्याची जागा देण्याची तयारी दर्शवली होती.पण आता कॉंग्रेसने आपला हट्ट सोडून दिला आहे.