राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्दामुळे शिवसेनेला मुंबईत फटका बसणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई: परप्रांतीयांना विरोध सोडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने नाराज असलेला कट्टर शिवसैनिक मनसेकडे वळण्याची सेनेला भीती आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सेनेला याचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२००६ मध्ये राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली. परप्रांतीयांना विरोधाचा मुद्दा पक्षाच्या केंद्रस्थानी होता. मात्र केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मनसेला परप्रांतीय विरोधाची धार बोथट करावी लागली. मध्यंतरी पक्षाला योग्य सूर सापडत नव्हता. परिणामी १ आमदार आणि मुंबई महापालिकेत १ नगरसेवक अशी मनसेची दयनीय स्थिती झाली.

मनसेने आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी घेतला आहे. पितृपक्ष शिवसेना हिंदुत्व अन मराठी हे कार्ड वापरते आहे. मात्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने २०१९ मध्ये धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कट्टर शिवसैनिक नाराज झाला. मात्र शिवसेना नेतृत्वावर होणारे भाजपकडुनचे सततचे हल्ले कट्टर शिवसैनिकांना पसंत नव्हते.

आता या कट्टर शिवसैनिकांना मनसेच्या रुपाने जहाल हिंदुत्ववादी पर्याय लाभला आहे. पुढच्या चार ते सहा महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्याचे शिंग मनसेने फुंकले आहे. त्यामुळे नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे या सुवर्ण चतुष्कोनात शिवसेनेला फटका बसण्याची भीती आहे.

मनसेला हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने विशेष लाभ होणार नाही. मात्र त्याचा फटका शिवसेनेला मोठा बसू शकतो. जसे वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला १० मतदारसंघात आणि विधानसभेला ३२ जागांवर फटका दिला होता. त्याची पुनरावृत्ती मनसेच्या रुपाने महापालिका निवडणुकीत होण्याची भीती सेनेचे नेते व्यक्त करत आहेत.

२०१९ ची विधानसभा भाजप-शिवसेनेने युतीत लढवली होती. त्यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभेला शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा पराभव होवून त्यांना ६५ हजार ८५४ मते मिळाली होती. काल झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभव होवून स्वबळावर ७७ हजार ४२६ मते मिळाली. याचा अर्थ सेनेची मते भाजपकडे फिरली आहेत.मुंबई महापालिकेला २३६ नगरसेवक आहेत. येथे ५०० ते ७०० फरकाने नगरसेवक जिंकतो. मुंबईत ३९ टक्के हिंदी भाषक व ४२ टक्के मराठी भाषक मतदार आहेत. शिवसेना मराठी कार्ड खेळते आहे. आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने कट्टर शिवसैनिक जर मनसेकडे गेले तर मराठी मतांचे विभाजन होवून त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous article७७ हजार मते फक्त भाजपची असतील तर त्यामध्ये मित्र पक्षांचे अस्तित्व नाही का ?
Next articleकोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय, महागाईचे चटके कमी होणार आहेत का ?