७७ हजार मते फक्त भाजपची असतील तर त्यामध्ये मित्र पक्षांचे अस्तित्व नाही का ?

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यावरुन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुचक ट्विट करीत भाजपला टोला लगावला आहे. ७७ हजार मते फक्त भाजपची असतील तर इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याची टिका भाजपने करीत भाजपला मिळालेली ७७ हजार मते ही फक्त भाजपची असल्याचा दावा केला होता.आता यावरुन शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करीत भाजपला फटकारले आहे. या निवडणुकीत भाजप एकटा नव्हता तर भाजप सोबत आरपीआय,शिवसंग्राम, रासप,जनसुराज्य, रयत क्रांती आणि जनसुराज्य असे पक्ष होते. त्यामुळे भाजपला मिळालेल्या मतांमध्ये या पक्षांचे योगदान नाही का असा सवाल सामंत यांनी केला आहे. अमरावतीच्या खासदार
नवनीत राणा यांनी दिलेल्या इशा-यावरही सामंत यांनी भाष्य केले.नवनीत राणा यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे अशा शब्दांत उदय सामंत यांनी खासदार नवनीत राणा यांचा समाचार घेतला.तसेच महाविकास आघाडीचा पॅटर्न हा राज्यात यापुढे सुद्धा रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleभाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई !
Next articleराज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्दामुळे शिवसेनेला मुंबईत फटका बसणार !