बिनविरोधाचे प्रयत्न फेल : अंधेरी पोटनिवडणुकीत ‘या’ ६ अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक अटळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर होत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी राजकीय परंपरेचे पालन करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपला केले होते.भाजपामध्ये झालेल्या घडामोडीनंतर अखेर शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटकेंविरोधातील भाजपचे मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.अन्य पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले असले तरी सहा अपक्षांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती.शिवसेनेत झालेल्या बंडानंतर प्रथमच होणा-या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गट भाजप आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमनेसामने येणार होते. राजकीय वर्चस्वाच्यामुळे ही निवडणूक सर्वांनीच प्रतिष्ठेची केली होती.उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी न्यायालयाचे दारे ठोठवावी लागली होती.भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती.भाजपच्या उमेदवाराला शिंदे गटाने पाठिंबा दिला होता तर शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना काँग्रेस राष्ट्रवादी सह डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.कालच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.राज ठाकरे यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन देत पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.

या आवाहनानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली.भाजपच्या उमेदवाराने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आणि ६ अपक्षांनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि ६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने ही पोटनिवडणुक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय नक्की असला तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मातब्बर नेत्यांनी केलेले प्रयत्न वाया गेल्याची चर्चा आहे.

ऋतुजा लटकेंच्या विजयासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय : चंद्रशेखर बावनकुळे

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे बाळासाहेबांची शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक अर्ज मागे घेतील. कै. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपाने हा महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय घेतला,अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे.अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे.तथापि, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.राज ठाकरे यांच्या विनंतीला मान देवून भाजपने उमेदवारी माघारी घेतल्याने फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.चांगली,सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी,वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो.त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत.

पोटनिवडणुकीत उमेदवारी कायम ठेवलेले उमेदवार :

१ ऋतुजा लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२ ) बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३ ) मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४ ) नीना खेडेकर (अपक्ष)
५ ) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६ ) मिलिंद कांबळे (अपक्ष)
७ ) राजेश त्रिपाठी (अपक्ष)

माघार घेतलेले उमेदवार

१ ) मुरजी पटेल ( भाजप )
२ ) निकोलस अल्मेडा ( अपक्ष )
३ ) शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष)
४ ) राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
५ ) चंद्रकांत मोटे (अपक्ष)
६ ) पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
७ ) चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

Previous articleखूशखबर : दिवाळीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना बिनव्याजी १२ हजार ५०० रूपयांचा अ‍ॅडव्हान्स मिळणार
Next articleनंबर १ असल्याचा भाजपाचा दावा : भाजप शिंदे गटाचा ४७८ तर मविआचा २९९ ग्रामपंचायतींवर विजय