पराभवानंतर हिमालयात जाणार का ? काय उत्तर दिले चंद्रकांतदादा पाटील यांनी !

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर । कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात आणि कोल्हापूरात एकच चर्चा होती ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का ? कोल्हापूरमधून कधीही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे,जर तिथून हरलो, तर हिमालयात निघून जाईन, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षापूर्वी केले होते.आज कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.त्यावर खुद्द चंद्रकांच पाटील यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेली साली विधानसभा निवडणूक पुण्यातील कोथरूडमधून जिंकली होती.पण तेव्हा पाटील कोल्हापुरातून पळून आल्याची टीका विरोधकांनी केली होती.आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि चंद्रकांतदादांच्या या विधानाची समाज माध्यमांत जोरदार चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.त्यावेळी कोल्हापूरमधून कधीही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे,जर तिथून हरलो, तर हिमालयात निघून जाईन, असे विधान मी केले होते असे पाटील यांनी सांगितले.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे पाटील यांनी सांगितले.काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो.सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये.या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

राज्यात भाजपाचे सरकार नाही.भाजपाच्या विरोधात दडपशाही,दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे.भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.

Previous articleकोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत करूणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली !
Next articleमुख्यमंत्र्यानी निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना केली होती; शरद पवारांचे बारकाईने लक्ष होते