सरकार खोटारडे,सरकारवर  विश्वास राहिला नाही: अण्णा हजारे

मुंबई नगरी टीम

अहमदनगर: सध्या सत्तेत असलेले भाजपचे सरकार जेव्हा विरोधी बाकांवर होते तेव्हा लोकपाल नियुक्तीसाठी त्यांनी रान उठवले होते.मग आता हे सगळे नेते सत्तेत आल्यावर गप्प का,असा हल्ला अण्णा हजारे यांनी चढवला.तेव्हाचे विरोधक सत्ता आल्यावर गद्दारी करत आहेत. या सरकारवर विश्वास राहिलेला नाही,असे ते उद्विग्नपणे म्हणाले.

राज्य सरकार म्हणत आहे की माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. पण हे सरकार खोटारडे आहे.मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी उपोषण कशाला करत बसलो असतो? मागण्या मान्य होऊन उपोषण करत बसायला मी वेडा आहे का?असा सवाल त्यांनी केला.सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार आहे,असेही अण्णा म्हणाले.लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपचे सरकार आले.पण आता त्यांना माझा विसर पडला आहे,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.देशातील सत्ता परिवर्तन होऊन काही साध्य होणार नाही.येथील व्यवस्था बदलली पाहिजे,असे ते म्हणाले.

केंद्रातील मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटण्यास येणार होते.मी त्यांना म्हणालो की,तुम्ही येऊ नका.तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.तुम्ही मागण्या किती मान्य झाल्या हे लेखी कळवा.त्यावर आम्ही विचार करू कारण तुमच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही,असे अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Previous articleवाह रे सरकार तेरा खेल मांगा न्याय मिला जेल : छगन भुजबळ
Next articleममता बॅनर्जींचे वर्तन घटनेनुसारच : प्रकाश आंबेडकर