मुंबई नगरी टीम
अहमदनगर : जिल्ह्यातील पुणतांबे गावातील शेतकऱ्यांच्या मुलीनी अन्नत्याग करण्याचे आंदोलन सुरु केले असून आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सरकारला चांगलेच फटकारले.शेतकऱ्यांच्या मुलीना उपोषण करण्याची वेळ सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानेच आली असून दोन मुलीची प्रकृती गंभीर आहे, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे, असे ते म्हणाले.शेतकरी वर्गाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या मुलीना निराश होऊन उपोषणास बसावे लागते आहे. हे कशाचे द्योतक आहे? शेतकर्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पाचशे रुपये मदत देण्याची केलेली घोषणा मलमपट्टी आहे आणि त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.पाच वर्षात केलेल्या दुर्लक्षामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही उध्वस्त झाले आहेत.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. पुणतांबे येथील शेतकऱ्यांच्या कन्यांनी उपोषण सुरु केले असून अद्याप सरकारने त्यांच्या आंदोलनाची काहीही दखल घेतलेली नाही. यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांच्या मुलीना उपोषणास बसावे लागते, हे दुर्दैव आहे, असे चव्हाण म्हणाले.
या शेतकऱ्यांच्या मुलींचे वजन दोन किलोने घटले असून दोघींना तर रुग्णालयात हलवावे लागले आहे.त्यांच्या समर्थनार्थ पुणतांबे बंद करण्यात आले होते. शाळकरी मुलीनीही त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन काळे झेंडे घेऊन मोर्चा काढला होता. याच गावातून शेतकरी संप पुकारण्यात आला होता. शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव अशी या मुलींची नावे असून अद्याप तरी सरकारने त्यांच्या या आंदोलनाकडे कानाडोळा केला आहे.त्यामुळे गावात सरकारविरोधात संताप आहे.जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी जाऊन मुलींशी चर्चा केली. तुमच्या तक्रारी सरकारकडे पोहचवू असे त्यांना आश्वासन दिले. मात्र आम्हाला काही झाले तर आम्ही सरकारला जबाबदार धरू, असे या मुलीनी म्हटले आहे.