मुंबई नगरी टीम
मुंबई: सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.पुण्यातील कार्यक्रमात भाजपाने लोकसभेच्या ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता.याच मुद्यावरुन सामनातून भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. युतीचे लटकलेल्या अवस्थेत आहे त्याला भाजपाचा जबाबदार असून, चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
काय आहे अग्रलेखात…..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे मुक्कामी फडणवीस यांनी नारा दिला आहे की, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत ४३ जागा जिंकू.’’ फडणवीस यांचा असाही दावा आहे की, यावेळी आम्ही बारामतीत पवारांचा पाडाव करू. यावर पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाजपास शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे ४८ जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर ५४८ जागा कुठेच गेल्या नाहीत. ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, पण ‘‘याला पाडू, त्याला पाडू, त्याला गाडू’’ वगैरे भाषा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहेत. पाडापाडीची भाषा यांच्या तोंडात इतकी रुळली आहे की, एखाद दिवस ‘स्लिप ऑफ टंग’ होऊन स्वतःच्याच अमुक-तमुक लोकांना पाडू असे यांच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणजे झाले. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे.