आकस्मिकता निधीत दोन हजार कोटींची वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात २०१८ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे १५१ तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या १५० कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत २ हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती २ हजार १५० कोटी इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार आज निर्णय घेण्यात आला.

Previous articleराज्यात आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू
Next articleनागपूर-अमरावती विभागातील नझूल जमिनी फ्री-होल्ड करण्यास मान्यता