मुंबई नगरी टीम
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजप पुन्हा लोकसभा उमेदवारी देण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. रक्षा यांच्यासोबत सासरे एकनाथ खडसे यांनी अद्याप पक्षात रहायचे की नाही याचा निर्णय घेतलेला नाही.
रावेर हा मतदारसंघ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. लेवा पाटीदार समाज येथे चाळीस टक्के असून हा समाज ज्याच्या पाठिशी राहील तो नेता निवडून येतो. खडसे याच समाजाचे आहेत.रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली तर हरिभाऊ जावळे यांचा पर्याय भाजपकडे आहे. खडसे यांनी आपण लोकसभा लढवणार नाही,असे अगोदरच सांगून टाकले आहे. मात्र पक्ष सोडण्याबद्दल त्यांनी सर्वांना अंदाज करत बसवले आहे. सूचक विधान करून ते परत भाजप सोडण्याचा प्रश्न नाही,असेही ते म्हणतात. त्यामुळे राष्ट्रवादीला आपला निर्णय घेता येत नाही. राष्ट्रवादीने रावेरची जागा खडसे यांनी पक्ष सोडला तर त्यांच्यासाठी ठेवली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने अजून आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात आली तर बहुधा खडसे पक्षांतर करतील,अशी शक्यता आहे. सध्या सारे अनिश्चिततेचे वातावरण आहे.