मुख्यमंत्र्यांचे हेलिकाँप्टर तासगावजवळ भरकटले

मुंबई नगरी टीम
तासगावः मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामागे लागलेले हेलिकॉप्टर भरकटण्याचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. तेव्हा पुन्हा आज त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. त्यामुळे काही क्षण चांगली घबराट निर्माण झाली होती. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावी हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री आज दुपारी दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी येणार होते.प्रशासनाने फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसाठी सूतगिरणीच्या हेलिपँडची जागा ठरवली होती तर केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हेलिकॉप्टरसाठी सैनिकी शाळेचे हेलिपँड निश्चित केले होते.पण गेहलोत यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे सैनिकी शाळेची जागा रिक्त राहिली.सर्व प्रशासकीय अधिकारी सूतगिरणीच्या हेलिपँडवर थांबले होते.
फडणवीस यांचे हेलिकॉप्टर सूतगिरणीच्या  जागेजवळ आले पण त्याचे लँडिंग झालेच नाही.अचानक फडणवीस यांचे हेलिकॉप्टर सैनिकी शाळेच्या दिशेने गेले आणि कुणाला काही कळायच्या आत हेलिपँडवर उतरले. प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली.मुख्यमंत्री सुखरूप असल्याचे पाहून सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हेलिकॉप्टर भरकटले कसे,हे अजूनही समजले नाही.यापूर्वीही फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटण्याच्या घटना घडल्या आहेत. लातूर येथे फडणवीस अशा दुर्घटनेतून बचावले होते.
Previous articleपुलवामा दहशतवादी हल्ला पुर्वनियोजित : शरद पवार 
Next articleभाजपने पालघरची जागा शिवसनेनेला सोडली  ?