शनिवारी धनगर आरक्षणावर शिक्कामोर्तब होणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या मुद्द्यावर राज्य सरकार सकारात्मक असून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत येत्या शनिवारी राज्याच्या महा अधिवक्त्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धनगर समाजाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिले. उद्धव ठाकरेंच्या समवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. डॉ. विकास महात्मे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धनगर समाजाच्या नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. या बैठकीला शिवसेना आ. तानाजी सावंत आ. नारायण आबा पाटील तसेच हनुमंत तात्या चौरे, शिवाजी शेंडगे, सुरेश होलगुंडे बाळासाहेब कर्नवर , राम गावडे, पांडुरंग मेरगळ, योगेश गोरे आदि उपस्थित होते.
मराठा समाजाला शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळाले असतानाच आता राज्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.धनगर समाजास आरक्षण देण्याची घोषणा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु अद्याप धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे.धनगर आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल प्राप्त होताच, केंद्राकडे तशी शिफारस केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात दिले होते. तर पुढच्या आठवड्यात रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मुंबईत मेळावा आयोजित केला आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षही धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.