बारामती की माढा महादेव जानकरांपुढे पेच

बारामती की माढा महादेव जानकरांपुढे पेच

मुंबई नगरी टीम

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासमोर बारामती की माढा लोकसभा मतदारसंघातून लढायचे, हा प्रश्न आहे. मात्र येत्या आठ दिवसात मी निर्णय घेईन, असे जानकर यांनी सांगितले. तसेच आपण स्वतः बारामतीसाठी आग्रही आहोत पण कार्यकर्त्यांची मागणी माढा येथून लढावे, अशी आहे, असे त्यांनी सांगितले.  कोणत्या मतदारसंघातून लढायचे, हे आठ दिवसात जाहीर केले जाईल,  असे जानकर यांनी सांगितले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असल्याने अनेक जण निवडून आले, पण यंदा अशी काही लाट नाही. त्यातच शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आले आहे. शिवाय धनगर आरक्षणाचा मुद्दा लटकला आहे. यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचे दिसते. मेगा भरतीच्या नुसत्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात एकालाही सरकारी नोकरी लागलीच नाही. यामुळे जानकर हे आता रासपतर्फे नव्हे तर भाजपतर्फे उभे राहण्याच्या तयारीत आहेत असे कळते.

महादेव जानकर यांनी काही वर्षांपूर्वी धनगर समाजाला संघटित करुन शाखांच्या माध्यमातून गावोगावी आपली ओळख निर्माण केली. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्‍वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आदेश काढू, असे वचन त्यांनी दिले होते. अजूनही काहीही हालचाली नाहीत. त्यामुळे धनगर समाज प्रचंड अस्वस्थ आणि नाराज आहे. त्याने भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे धनगर नेते सांगतात. जानकर यांना तर धनगर नाराजीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. म्हणून त्यांनी यंदा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. सत्तेत असूनही गेल्या साडेचार वर्षात जानकरयांनी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले नाही. मात्र आता मोदी लाट आणि भाजप सरकारसाठी अनुकूल वातावरण नसल्याने जानकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवायचे ठरवले आहे. अर्थात माढा येथे त्यांना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याशी लढत द्यावे लागणार आहे आणि बारामतीत उभे राहिले तर सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची लढत होईल.मात्र माढा येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने जानकर यांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र धनगर समाजाने आपल्या समाजाचे उमेदवार म्हणून मतदान न करता आरक्षण न मिळाल्याने नाराजीतून मतदान केले तर मात्र जानकर यांना तोटा होऊ शकतो. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. महादेव जाणकार यांनी २०१४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला होता आणि सुप्रिया सुळे ६४ हजाराच्या मताधिक्याने निवडून आल्या. पण आता मात्र जानकर यांच्यासाठी दोन्ही ठिकाणी सत्वपरीक्षा आहे.

Previous articleमोदींकडून सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न : भुजबळ
Next article मावळमधून आबांची कन्या निवडणूक रिंगणात ?