माझे देवेंद्र फडणवीसांशी भांडण पण त्याचा फायदा दुस-याला होऊ देणार नाही

मुंबई नगरी टीम

बारामती : राज्यातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.महादेव जानकर हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात होती. मात्र, आपले आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण असले तरी त्याचा फायदा दुस-याला होऊ देणार नाही, असे जानकर म्हणाले. तसेच आपण भाजपसोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत एका कार्यक्रमात आलेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकारणात नवी उलथापालथ होण्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावर स्वतः जानकर म्हणाले की, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे त्यांनी सांगितले. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण एनडीमध्येच आहोत, आणि तिथेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचे नसते, असे म्हणत त्यांनी रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

भाजपवर नाराज असलेले नेते एकामागून एक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्यासह नाराजांच्या यादीत महादेव जानकर यांचे देखील नाव घेतले जात आहे. त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे जानकर आता महाविकास आघाडीमध्ये सामिल होणार, अशी चर्चा रंगली होती. परंतु आपण भाजपसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. शिवाय या भेटीची कल्पना फडणवीसांना दिली होती, असा दावाही जानकारांनी केला आहे.

Previous articleराज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण ;लसीकरणासंबंधीत राजेश टोपेंचे मोठे विधान
Next articleमराठा आरक्षणप्रश्नी तूर्तास दिलासा नाही, तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार