मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघितल्यामुळेच आज ही अवस्था: एकनाथ खडसे
मुंबई नगरी टीम
जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात अनेक मंत्रिपदे मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघितले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आज आपली ही अवस्था झाली, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
आज जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एक शाम नाथाभाऊ के नाम या मुशायराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्याकडे अल्पसंख्यांक खाते असताना मुस्लिम वक्फ बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. त्यावेळी एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानी यांची निघाली.ही कारवाई सामाजिक भावनेतून केली होती. मात्र ही कारवाई काही जणांना आवडली नाही असेही खडसे यांनी सांगितले. मंत्रिपदाचे काय येतात आणि जात असतात. गेल्या 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली. पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे अशी इच्छा एका कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघितल्यामुळेच आणि कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आज आपली अशी अवस्था झाली, असे सांगत खडसेंनी पुन्हा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.