मी ईशान्य मुंबईतून लढावे असे भाजपला वाटत नाही : रामदास आठवले
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेला ही असे वाटत आहे मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नाही असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
भाजपला वाटते मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागेपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्चित मिळावी अशी अपेक्षा ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई महापालिकेच्या निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहाचीउभारणी करण्यात आली आहे.त्याचे लोकार्पण निमित्त आयोजित जाहीर सभेत आठवले बोलत होते.
कामराज नगर मधील जनता विकास कामांपासून वंचित आहे.त्यांच्या प्रश्नांकडे स्थानिक खासदार किरीट सोमय्या लक्ष देत नाहीत. पाच वर्षांत आमचा खासदार आम्हाला दिसलाच नाही अशी नाराजगी स्थानिक शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समोर व्यक्त केली. आम्हला आमचा खासदार रामदास आठवलेंसारखाच हवा.रामदास आठवले हे सर्व सामान्य जनतेच्या सुखदुःखात सामील होतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत काम करीत असतात.सदैव जनतेत मिसळणारा नेता म्हणुन ना रामदास आठवले हेच ईशान्य मुंबई चे खासदार व्हावेत असे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले की इथे शिवसेना भाजप असा वाद करू नका. आता शिवसेना भाजप युती झाली आहे. आम्ही शिवसेना भाजप दोन्ही पक्षांच्या युती सोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. शिवसेना नगरसेवकांना आणि ईशान्य मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांना मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी असे वाटते मात्र ज्यांना ( भाजप ला) असे वाटायला पाहिजे त्यांना अजून वाटत नाही अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई दोन्ही पैकी कोणत्याही मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे. एक ही मतदार संघ रिपाइं ला नाही सुटला तरी मी राज्यसभेवर आहे . आगामी लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारचाच विजय होणार असून तुमचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद निश्चित मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केली.