पंकजा मुंडेंच्या महिला व बालविकास  विभागात १०६ कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा

पंकजा मुंडेंच्या महिला व बालविकास  विभागात १०६ कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा

मुंबई नगरी टीम

मुंबई:  राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या महिला व बालविकास विभागात १०६ कोटी रुपयांचा आणखी एक मोबाईल घोटाळा उघडकीस आला आहे. अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करावयाच्या सहा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांनी खरेदी करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचा गंभीर  आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की, राज्यातील एक लाख वीस हजार अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी ॲन्ड्राईड बेस्ड मोबाईल फोन खरेदी करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी घेऊन तशा प्रकारचा शासन आदेश काढला होता.मे. सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या पुरवठा दारांकडून पॅनॉसानिक ईलुगा आय-सेव्हन या कंपनीचे मोबाईल फोन प्रत्येकी आठ हजार आठशे सत्याहत्तर याप्रमाणे खरेदी करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.  त्यासाठी विभाग १०६ कोटी ८२ लाख १३ हजार ७९५ रुपये खर्च करणार आहे.  मात्र या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मंत्रालयासमोरील त्यांच्या बी-४ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी किरकोळ ऑनलाईन बाजारात हा फोन सहा हजार ते साडे सहा हजार रुपयांमध्ये उपलब्ध असतांना विभागाने मात्र घाऊक किंमतीत एक लाख वीस हजार मोबाईल खरेदी करतांना त्यापेक्षा कमी किंमतीने खरेदी करण्याची आवश्यकता असतांना आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांना खरेदी करुन हा भ्रष्टाचार केला असल्याचा दावा केला.सदर पुरवठादार कंपनीने या मोबाईलची किंमत आठ हजार आठशे सत्त्याहत्तर पेक्षा कमी करणार नसल्याचे कळविल्यानंतरही याच पुरवठा दाराकडून खरेदी का केली,  याच किंमतीत यापेक्षा चांगल्या स्पेसिफिकेशनचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल बाजारात उपलब्ध असतांना बाजारात उपलब्ध न होणारी आणि बंद पडलेल्या कंपनीचे मोबाईल का खरेदी केले असा सवाल  मुंडे यांनी केला आहे.

हा मोबाईल सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाही.  त्याचे उत्पादन कंपनीने चार महिन्यापुर्वीच बंद केलेले असतांना कंपनीचा जुना माल विक्री करण्यासाठी विशिष्ठ पुरवठादाराला मदत करण्यासाठीच सरकारचे १०६ कोटी रुपये उधळले असल्याचा गंभीर आरोप  मुंडे यांनी केला.ज्या कंपनीला हे १०६ कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपीटल फक्त ५ कोटी ५० लाख आणि पेड अप कॅपीटल केवळ ४ कोटी ९२ लाख ६५ हजार इतके असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

यापुर्वी देखील विभागाने मोबाईल खरेदी करीत असतांना अनाकलनिय रित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊनही पुन्हा अशाच प्रकारे खरेदी होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.  या मोबाईलच्या खरेदीच्या निर्णयात तातडीने स्थगिती देऊन या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी  मुंडे यांनी केली आहे. याआधी झालेल्या चिक्की असो की डाळ घोटाळा, कोणत्याही घोटाळ्याची मुख्यमत्र्यांनी चौकशी केली नसून तुम खाते रहो हम संभालते रहेंगे हीच त्यांची पारदर्शकता असल्याचा टोलाही लगावला आहे.

Previous articleमी ईशान्य मुंबईतून लढावे असे भाजपला वाटत नाही : रामदास आठवले
Next articleमहाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही : मुख्यमंत्री