ओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे हा निकाल लागला : पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आनंद

मुंबई नगरी टीम

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण बहाल झाले आहे,या निर्णयाचे मी स्वागत करते.राज्यात ओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे हा निकाल लागला आहे. आता ओबीसींना प्रतिनिधित्व,न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

पंकजाताई पुढे म्हणाल्या,आरक्षणाच्या या लढाईत ओबीसींनी खूप संघर्ष केला. समजुतीने हा लढा लढला. राजकारणातील भविष्याबद्दल ओबीसींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती,ही अस्वस्थता ग्रामीण भागात अधिक होती.आमच्या मागच्या वेळच्या सरकारने हे आरक्षण टिकवले होते पण महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे आरक्षण गेले हे सत्य आता विरोधकांनी स्विकारले पाहिजे. आरक्षणाशिवाय ओबीसींना निवडणुका जड गेल्या असत्या. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी हेच आमचे मत होते. जनगणनेचा मुद्दा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी लोकसभेत लावून धरला होता. मुळात कोणतीही जनगणना ही समाजाची, जनतेची आवश्‍यक माहिती गोळा करण्यासाठी होते. जाती पातीमध्ये भिंती उभ्या करणे हा उद्देश नसतो असं पंकजाताई म्हणाल्या. मध्यंतरी काही निवडणुका आरक्षणाशिवाय झाल्या होत्या, तो दिवस ओबीसींसाठी काळा दिवस होता तथापि, आजचा हा निकाल तमाम ओबीसींना सुखावणारा आहे, याचं मी स्वागत करते आणि आमच्या सरकारचं अभिनंदन करते असंही त्या म्हणाल्या.

Previous articleपुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात : माजी मंत्र्याचे सूचक वक्तव्य
Next articleतुम्ही लिहून घ्या, राज्यातील शिंदे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार