महापौर व आयुक्तांची हकालपट्टी करा : खा. चव्हाण
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या भ्रष्ट आणि दळभद्री कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत? या निर्लज्ज आणि बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून भाजप शिवसेनेला जराही शरम असेल तर महापौर आणि मनपा आयुक्तांची तात्काळ हकालपट्टी करावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भाजप शिवसेनेच्या दृष्टीने मुंबईकरांचे जीवन एवढे स्वस्त झाले आहे का? असा संतप्त सवाल करून चव्हाण म्हणाले की, मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्या पुलाचे सुरक्षा ऑडिट करून पुलाला सुरक्षित घोषित केले होते, तोच पूल काल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सहा लोकांचा मृत्यू झाला व तीस पेक्षा जास्त मुंबईकर गंभीर जखमी झाले आहेत. या पुलाचे ऑडिट कोणी केले? या ऑडिटमध्येही कमिशन घेतले का? मुंबईकरांच्या जन्म दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बकासुराप्रमाणे पैसे खाल्ले जातात. निर्ढावलेले महापालिकेती सत्ताधारी आणि सरकार अशा घटना घडल्यावर एकमेकांवर जबाबदारी ढकलून रिकामे होतात पण कधीही जबाबदारी निश्चित केली जात नाही, कारवाई होत नाही. एलफिन्स्टन रोड दुर्घटनेप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. कमला मिलसारख्या निरनिराळ्या आगीच्या घटना, इमारती कोसळल्याच्या किंवा पूल पडण्याच्या घटना असतील यातून मुंबईकरांना मारण्याचे काम सातत्याने सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट नेत्यांना कामाचा दर्जा चांगला राखण्याऐवजी कमीशन खाण्यातच जास्त रस आहे, हे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे यांना जराही शरम असेल तर तात्काळ महापौर व आयुक्तांची हकालपट्टी करून सर्व पादचारी पुलांचे पुन्हा ऑडिट करावे. तसेच या घटनेला जबाबदार असणा-या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.