डॉ. हिना गावितांना मराठा मोर्चाचा विरोध
मुंबई नगरी टीम
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात मोठा असंतोष आहे.पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या खासदार डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये, यासाठी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने जोरदार विरोध केला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे.हिना गावित यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचा इशाराही मोर्चाने दिला आहे.
नंदुरबार मतदारसंघात हिना गावित यांना जोरदार विरोधाला सामोरे जावे लागत आहे. येथे जातीचे राजकारण अत्यंत तीव्र आहे.धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे देऊ केलेल्या सेवा-सुविधांमुळे जिल्ह्यातील आदिवासी नाराज झाले आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चेही त्यांनी काढले होते.काँग्रेसने भाजपला विरोध म्हणून आदिवासींची बाजू घेतली.आता मराठा क्रांती मोर्चाने धुळ्यातून हिना गावित यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. भाजपने डॉ गावित यांना उमेदवारी देऊ नये,अशी मागणी मराठा मोर्चाने केली आहे. डॉ.गावित यांना उमेदवारी दिली, तर विरोधात प्रचार करण्याचा इशाराही मोर्चाने दिला आहे.
राज्य सरकारने धनगर समाजाबाबत घेतलेली भूमिकाही नंदुरबारमध्ये गावित कुटुंबियांना अडचणीत आणणारी ठरणार आहे.सरकारचा हा निर्णय गावितांना मारक ठरणार आहे. पक्षाविरोधात भूमिका घेता येत नाही आणि आदिवासी समाजाच्या हक्कांवर होणारे आक्रमण मुकाट पाहावे लागत असल्यामुळे गावित कुटुंबीयांची कोंडी झाली आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर विजयी होण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत. हक्काची आदिवासी व्होट बँक कामाला येणार नाही.