भाजपच्या तिस-या यादीतही घटक पक्षांना स्थान नाही
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपची महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी काल रात्री उशिरा जाहीर झाली.दुसऱ्या यादीतही घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नसल्याने घटक पक्ष चांगलेच नाराज झाले आहेत.त्यामुळे.रासपचे महादेव जानकर यांनी बैठक बोलवली असून त्यात पुढील निर्णय होऊ शकतो. अर्थात जानकर युतीतून बाहेर पडण्याची शक्यता मुळीच नाही. बारामतीच्या जागेवरून रासपच्या कांचन कुल यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पण त्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने जानकर नाराज आहेत.
कांचन कुल या रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत.मात्र त्या भाजपच्या उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. घटक पक्षांना युतीने डावलल्याने आता रासपची पुढची भूमिका ठरवण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची बैठक जानकर यांनी बोलावली असल्याची माहिती आहे.या बैठकीत रासपची पुढील दिशा कळू शकणार आहे. स्वतः जानकर माढ्यातून किंवा बारामती येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आता बारामतीचा प्रश्न तर संपला आहे.अद्याप माढ्याचा उमेदवार ठरलेला नाही. तीच एक आशा जानकर यांना आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम आहे.दक्षिण नगरची जागा जशी काँग्रेसला हवी होती.पण विखे पवार घराण्यातील वितुष्ट राष्ट्रवादीच्या हट्टाला कारण ठरले.औरंगाबादची जागा काँग्रेसकडे राष्ट्रवादीने मागितली होती. औरंगाबादच्या बदल्यात नगर असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता.पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही आणि सुजय विखे पाटील सोडून गेले. तसेच काँग्रेसने औरंगाबाद जागा सोडली नाही आणि उमेदवार जाहीर करून टाकला आहे.याचा परिणाम निवडणुकीत होऊ शकतो.