मी चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही

मी चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही

मुंबई ‌नगरी टीम

पंढरपूरःमाढा लोकसभा निवडणूक राज्यात गाजत आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा आतापासूनच रंगत आणत आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या धमक्यांना आपण घाबरत नाही, असे प्रत्युत्तर माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिले आहे. संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले होते.

शिंदे म्हणाले की,मी कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता. त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत.रणजीतसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय शिंदे राष्ट्रवादीमध्ये सामील झाले होते.

संजय शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली असून त्यांना किंमत मोजावी लागेल, असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. संजय शिंदे हे साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते. त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळवले होते.मात्र राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची आहे. ही फसवणूक जिव्हारी लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी संजय शिंदेंना सुनावले होते.माढा मतदारसंघात अजून भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना तेथे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील या मातब्बर घराण्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Previous articleतर… सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार !
Next articleपार्थ पवार यांच्यासाठी सख्खा भाऊ मैदानात