भाजपा ही फेकू पार्टी  : धनंजय मुंडे

भाजपा ही फेकू पार्टी  : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

अहमदनगर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  राज्यात येऊन पाच वर्षात राज्याला काय दिले हे का सांगू शकले नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमध्ये विचारला. भाजपा ही फेकू पार्टी असून ६ एप्रिल ऐवजी त्यांनी एप्रिल फुलच्या दिवशी  स्थापना दिवस बदलून घ्यावा असा टोला ही त्यांनी लगावला.

आज अहमदनगरमध्ये महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप, शिर्डीचे भाऊसाहेब कांबळे  यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या अभूतपूर्व प्रचार रॅलीत आणि त्यानंतर झालेल्या ऐतिहासिक संयुक्त सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. मोठ्या संख्येने उपस्थित जमलेली जनता पाहून वर्षावर च्या भविष्यकाराला सुद्धा मान्य करावंच लागेल की अहमदनगर दक्षिण आणि उत्तरचा निकाल हा महाआघाडीच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुपूत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगरचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप. संग्राम आईवडिलांची आज्ञा तर पाळतातच मात्र ते इथल्या जनतेचेही आज्ञाधारक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात आंदोलन करून निलंबित होणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. हाच लोकांप्रती खरा कळवळा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. सुपूत्र आणि कुपूत्र यांतील फरक आज नगरवासियांच्या समोर आहे. इथल्या भाजपा उमेदवाराचे नाव ‘कुजय असायला हवं होतं अशी खोचक टीका त्यांनी केली. पैशाच्या जोरावर उड्या मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने हातात मतदानाचे शस्त्र घ्या असे आवाहन  देत ही लढाई गर्वाच्या विरोधात लोकशाहीची असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्या मोदींवरसुद्धा तोफ डागली. सपनोंके सौदागर मोदी वर्ध्यात येऊन भर उन्हात आश्वासनांचा पाऊस पाडून गेले. जेमतेम उपस्थिती असलेल्या या सभेने मोदींना पराभवाचे चटके दिले.महाराष्ट्रात येऊन पवार  घरावर वाच्यता करण्यापेक्षा त्यांनी स्वप्रपंचाची जबाबदारी घ्यावी. मागच्या वेळी यांनी १५ लाखाचा जुमला फेकला, आता २० लाखांचाही फेकतील. यांचा काही नेम नाही. भाजपचा स्थापना दिन आणि मोदी दिन (फेकू दिन) एक एप्रिललाच साजरा करावा असा सल्ला देत त्यांनी, तुमच्या वर्तणुकीला अगदी साजेसा दिवस आहे अशी उपहासात्मक टीका केली.काल एका सभेत भाजपाचे जेष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष बदलुना पाडा असे आवाहन केले होते त्याचा संदर्भ घेत धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत भाजपा, सेनेच्या तिकिटावर उभे असलेल्या जुन्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे वाचून दाखवत गडकरींच्या आवाहनानुसार सुजय विखे यांना पाडा असे आवाहन केले.

 

 

Previous articleमला कुठलीच निवडणूक अवघड वाटली नाही
Next articleसरकारला लाज कशी वाटत नाही