मुंलूंड गोरेगाव लिंक रोड प्रकल्प नियोजित वेळेत पुर्ण होणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईच्या पुर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्वाचा असलेला मुलूंड लिंक रोड प्रकल्प नियोजित वेळेत पुर्ण होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला.
गोरेगाव फिल्मसिटी ते अमरनगर नाहूर हा १४ किमीचा सहापगरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहमा-या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार असून, त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलूंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.मुंबईच्या पुर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतके वर्षे कागदावर असणारा हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तरी या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्य शासनाच्या वर विभागाने मंजूर करून अंतिम मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्त असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्य शासनात्या पातळीवर यासाठी प्रयत्न केले आहेत असे कोटक यांनी सांगितले.
या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की,मुंलूंड गोरेगाव लिंक रोड हा ईशान्य मुंबई मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महानगरपालिकेत पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारीक मंजूरीनंतर येत्या ऑक्टोंबर महिन्यात हा प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असून, नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्यासाठी खासदार म्हणून आवश्यक तो सर्व पाठपुरावा करणार आहोत असेही ते म्हणाले.