देशातील जनता दिल्लीच्या तख्तावर पुन्हा भगवा फडकवणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : कॉंग्रेस आघाडीच्या सरकारने केंद्र व राज्यात सत्तेवर असताना एवढे घोटाळे केलेत की, एक बाराखडी तयार होईल. त्यांच्या काळातील घोटाळे आठवा मग विचारा लाज वाटते का ? असा घाणाघाती आरोप शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगूरनगर-गोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केला.
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या वेळचा सिंचन घोटाळा, टॉयलेट पेपर घोटाळा, शेण घोटाळा करणा-यांनी राफेलच्या व्यवहाराची चौकशीची मागणी करणा-यांची कीव वाटते. परदेशी व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणून शरद पवारांनी विरोध केला तेव्हा कॉंग्रेसने त्यांना लाथ मारली, आज तेच पवार राहुल गांधी-सोनिया गांधी बरोबर आहेत. तेव्हा लाज वाटत नाही का? अशी बोचरी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.
मी आदित्यपेक्षाही लहान होतो तेव्हापासून गजाभाऊ सेनेत कार्यरत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे सुरूवातीपासूनचे सहकारी असलेल्या गजानन कीर्तिकर हे एकच शिवसेना पक्ष आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा असलेला निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यांना तू विचारतोस कीर्तिकर तुम्ही पाच वर्षात काय केलं? अशी टीका उद्धव ठाकरेंनी निरूपम यांचे नाव न घेता केली.
मुंबई उत्तर-पश्चिमचे लोकसभा निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी खासदार म्हणून केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली. संसदेत जनतेच्या सोयी-सुविधांशी निगडीत १०१३ प्रश्न विचारले. खासदार निधीतून ४६.५० कोटी रूपये खर्चाची कामे केली. १०८ रूग्णांना १ कोटी ४७ लाख रूपये पंतप्रधान रूग्ण सहाय्यता निधी मिळवून दिला. जोगेश्वरी जवळील ओशिवरा येथे ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाची निर्मिती, अंधेरी व गोरेगाव रेल्वे स्थानकांचा देशातील ५० मॉडेल रेल्वे स्थानकांत समावेश, वर्सोवातील मच्छिमार बांधवांचे घराचे व व्यावसायिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले असे सांगून जनता आपल्याला पुन्हा निवडून देतील असा विश्वास कीर्तिकर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर संजय निरूपम नावाचा पळपुटा उभा असून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मतदार इथुनही त्याला पळवून लावतील असे मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी ठासून सांगितले. रिपब्लीकन जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे, त्यामुळे महायुतीचे मुंबईतील सहाही उमेदवार निवडून येतील असा विश्वास रिपाईं (आ) पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर आणि रिपब्लीकन नेते अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केला. तर मोदींना पाडायला निघालेले लढायला तयार नाहीत अशी टीका शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. याप्रसंगी युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे व्यासपिठावर तसेच रश्मी ठाकरे या सभेच्या ठिकाणी उपस्थित होत्या. राज्यमंत्री रविंद्र वायकर, विद्या ठाकूर, आमदार अॅड अनिल परब, आमदार अमित साटम, आमदार विलास पोतनीस, रिपाईं जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, रासपचे जिल्हाध्यक्ष मनिष पटेल, महीला विभाग संघटक साधना माने, राजुल पटेल,सरीता राजपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या जाहीर सभेचे सूत्रसंचलन विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभु यांनी केले.