मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी प्रविण परदेशी

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी प्रविण परदेशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून,मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीस दिवस राज्याचे मुख्य सचिवपदी असलेले  युपीएस मदान यांनी आज अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिव पदावर  मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव  प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे .प्रवीण परदेशी हे गेल्या साडेचार वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील म्हणून परिचित आहे. दोन्ही अधिकारी आपआपल्या पदाची सूत्रे सोमवारी घेणार असल्याचे समजते.

 मावळते मुख्य सचिव मदान यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दाखल केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तात्काळ मंजूर केला आहे. त्यामुळे  करार पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भांत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश निर्गमित केले आहे. त्याच बरोबर पुढील आठवड्यात सिकॉमच्या अध्यक्षपदी युपीएस मदान यांची नियुक्ती करण्यासही  मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या संदर्भात उद्योग विभाग स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करणार आहे.

Previous articleआरक्षण प्रश्नी सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला : धनंजय मुंडे
Next articleदुष्काळप्रश्नी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे