ओबीसी जागा वगळता एससी,एसटी आणि ओपन जागांसाठी २१ डिसेंबरलाच निवडणुका होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या ( ओबीसी ) जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे,मात्र ओबीसी जागा वगळता इतर जागांच्या निवडणुका या २१ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी आज दिली.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती,भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील.नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

राज्यातील भंडारा,गोंदिया या जिल्हा परिषदेसाठी एकूण १०५ जागांसाठी निवडणूक होणार आहेत.त्यापैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या एकूण २३ जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.भंडारा व गोंदियातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण २१० जागांसाठीही निवडणूक होत आहेत.त्यामध्ये असणा-या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या ४५ जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.तसेच येत्या २१ डिसेंबर रोजी राज्यातील १०६ नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये ३४४ जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आहेत.त्या ठिकाणच्या निवडणुका या स्थगित करण्यात आल्या आहेत.तर महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये १ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आहे त्याही ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

Previous articleमोठी बातमी : ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती
Next articleओबीसी आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : खा.सुप्रिया सुळेंची मागणी