प्रिती दुर्वे यांनी आजारी असल्याबद्दल निवडणूक विभागास कळविले नव्हते !

प्रिती दुर्वे यांनी आजारी असल्याबद्दल निवडणूक विभागास कळविले नव्हते !

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : शिवडी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कर्मचारी प्रिती दुर्वे यांचे आज निधन झाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

वस्तुतः त्या आजारी असल्याबद्दल त्यांनी निवडणूक विभागास काहीही कळविले नव्हते, अथवा विनंती केली नव्हती.निवडणूक कामातुन मुक्त करण्यात यावे असे कोणतेही निवेदन त्यांच्या कडून कार्यालयास प्राप्त झालेले नव्हते. निवडणूक विभागाकडे राखीव कर्मचारी असतात त्यामुळे अशी विनंती प्राप्त झाल्यास संबंधितास निवडणूक कामातून मुक्त करण्यात येते.

मतदानाच्या दिवशी तब्येत ठिक वाटत नसल्याने प्रीती दुर्वे यांना झोनल आॅफिसरने रुग्णालयात जावे असे सुचवले असता त्यांनी आपल्याला घरी जायचे असल्याचे सांगितले.
त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी श्रीमती दुर्वे यांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. तसेच त्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कळाल्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दोन वेळा त्यांची भेटही घेतली होती .

आज दि.११ मे २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. जिल्हा प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल.

निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती संदर्भात संबंधित कार्यालयाला सेवार्थ च्या आधारे यादी पाठवण्यात आली होती. या यादीतील कर्मचार्‍यांच्या बाबत काही अडचण असल्यास ती कळविण्यात यावी असेही सूचित केले होते.संबंधित विभागांकडून तशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले. तसेच वैयक्तिक अर्ज घेऊन आजारपणाबाबत ज्यांनी विनंती केली त्या कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले होते. जवळपास १९०० कर्मचारी या प्रक्रियेतून वगळले आहेत. मुंबई शहर निवडणूक कार्यालयाकडे राखीव कर्मचारी होते.त्यामुळे आजारपणाबद्दल कोणी अर्ज केल्यास तो अर्ज मान्य करून संबंधितांना निवडणूक कामातून मुक्त केले होते.

Previous articleअबब ! मोदींसह मंत्र्यांनी केले प्रवासावर तब्बल ३९३ कोटी खर्च
Next articleपालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश