अबब ! मोदींसह मंत्र्यांनी केले प्रवासावर तब्बल ३९३ कोटी खर्च

अबब ! मोदींसह मंत्र्यांनी केले प्रवासावर तब्बल ३९३ कोटी खर्च

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील ५ वर्षात मोठया प्रमाणात परदेशी आणि देशातंर्गत प्रवास केला असून या प्रवासांवर एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने हि माहिती दिली आहे. सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला असून, त्यावर झालेल्या एकूण खर्चाची रक्कम २९२ कोटी आहे तर देशातंर्गत प्रवासांवर ११० कोटी खर्च झालेला आहे. पंतप्रधानसह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी अनिल गलगली यांस ई- लेखाच्या आधारावर त्या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध वर्ष २०१४- २०१५ पासून वर्ष २०१८-२०१९ या ५ वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली आहे. ज्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही. गेल्या ५ वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण २५२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये खर्च करण्यात आले तर  देशातंर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये खर्च करण्यात आले तर देशातंर्गत प्रवासांवर  ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.

वर्ष २०१४- १५ मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ९८ कोटी ४८ लाख ६२ हजार ३५२ रुपये खर्च करण्यात आले आहे. तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ११ कोटी  २८ लाख ८१ हजार ४३९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. वर्ष २०१५- २०१६ मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ८४ कोटी ९९ लाख ८७ हजार ६२४ रुपये खर्च केले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर १३ कोटी १७ लाख ४१ हजार ४०७ रुपये खर्च करण्यात आले आहे. वर्ष २०१६- २०१७ मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ४५ कोटी ५१ लाख ७२ हजार ८२५ रुपये खर्च केले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर १२ कोटी ११ लाख २१ हजार ८३२ रुपये खर्च करण्यात आले आहे. वर्ष २०१७- २०१८ मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ३३ कोटी ८५ लाख ९७ हजार ४८३ रुपये खर्च झाले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर १७ कोटी ७९ लाख ८७ हजार १९९ रुपये खर्च करण्यात आले आहे. वर्ष २०१८- २०१९ मध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर ४८ कोटी ४९ लाख ९९ हजार ९८५ रुपये खर्च झाले आहे तर राज्यमंत्र्यांच्या परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर २७ कोटी ८३ लाख ९९ हजार ७४४ रुपये खर्च करण्यात आले आहे.

Previous article‘जलयुक्त’वर खर्च केलेले हजारो कोटी कोणाच्या घशात गेले?
Next articleप्रिती दुर्वे यांनी आजारी असल्याबद्दल निवडणूक विभागास कळविले नव्हते !