प्रीतमताई मुंडे यांचा विजय निश्चित ; १६ व्या फेरी अखेर ७० हजार मतांनी आघाडीवर
मुंबई नगरी टीम
बीड : लोकसभेच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु असून देशभरात भाजप अभूतपूर्व आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातही खा. प्रीतामताई मुंडे या १६ व्या फेरीअखेर ७० हजार मतांनी आघाडीवर होत्या. मतमोजणीचा ट्रेंड पाहता खा. प्रीतमताई यांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याने कार्यकर्त्यांचा ‘यशश्री निवासस्थानी प्रचंड जल्लोष सुरु आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आणि जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले.
बीडची निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. खा. प्रीतमताई मुंडे या स्वकर्तुत्वावर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या. प्रत्येक सभातून त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतानाच भविष्यातील विकासकामांचा आराखडा देखील जनतेसमोर ठेऊन आश्वासित केले. ना. पंकजाताईंनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचे वाभाडे काढत त्यांची पोलखोल केली. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाबाबत कुठलेही भाष्य न करता केवळ मुंडे भगिनींना दुषणे देण्यात धन्यता मांडली अतिशय खालची पातळीवर जाऊन मुंडे भगिनीं टीका करण्यात आली. याची चीड जनतेच्या मनात होती, तीच मतदानातून दिसून आली. मुंडे भगिनींनी विरोधकांच्या टोळीला जबरदस्त धोबीपछाड दिली असून १६ व्या फेरीपर्यंतच खा. प्रीतमताई ७० हजाराची आघाडी घेऊन विजयाच्या नजीक गेल्या आहेत.सकाळपासून निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना ताईंच्या विजय जवळ आल्याचा अंदाज येताच त्यांनी यशश्री निवासस्थनाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे वाजत गाजत आणि फटक्यांची आतिषबाजी करत यशश्री निवासस्थानाकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मुंडे भगिनींनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. दरम्यान, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांना आघाडी मिळताच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजाताई व प्रीतमताई यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.
यावेळी माध्यमांसमोर बोलताना पंकजाताईंनी जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा विकासाचा वारसा भविष्यातही चालू ठेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाची कास धरली. खा. प्रीतमताई मुंडे यांच्या विकास कामांना जनतेने कौल दिला. त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आज विजयाच्या वाटेवर असताना ना. पंकजाताई मुंडे साहेबांच्या आठवणीने भावूक झाल्या. सकाळी त्यांनी स्वतःचा व प्रितमताई यांचा बालपणीचा मुंडे साहेबांना फोनवर बोलतानाचा फोटो ट्विट केला होता. माझे बाबा तथा माझे नेते मुंडे साहेब यांची याप्रसंगी खूप आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे यश त्यांचेशी शेअर करता येत नाही पण आज त्यांना आमचे नक्कीच कौतुक वाटले असते आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजाताईंनी दिली.