विखे-पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे किती आमदार जाणार ?
मुंबई नगरी टीम
शिर्डी : माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच काँग्रेसचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते.विखे यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा असल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकतीच विखे-पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. विखे-पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे मंत्रीपद दिले जाणार आहे. परंतु त्यांच्या भाजपा प्रवेशावेळी ते काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक काँग्रेसचे आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.