दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही
मुंबई नगरी टीम
मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.चार-पाच वेळा निवडून आलेले पक्षात अनेक नेते आहेत परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही त्यामुळे स्वाभाविक ते नाराज होतात अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत आपला दुस-या पक्षात जाण्याचा विचार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. पुन्हा एकदा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिला नसून, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपामध्ये प्रवेश करून त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत मात्र दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही असेही खडसे यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी पक्ष बदलणे आपल्या स्वभावात नाही. विरोधी पक्षात असताना दुस-या पक्षांनी अनेक ऑफर दिल्या असता तुमचा पक्ष सत्तेत कधीच येणार नाही असे सांगितले होते. मात्र आज आम्ही सत्तेत आलो असल्याचे खडसे यांनी सांगितले. ४० वर्षे पक्षवाढीसाठी मेहनत घेतले. इतके वर्ष पक्षासाठी झटलो आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. पक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचे काम आम्ही केले त्यामुळे खडसे असले काय नसले काय त्याने काही फरक पडत नाही. भुसभुशीत जमिनीवर कोणतेही पिक घेतले तरी ते येणारच आहे असा टोला खडसेंनी लगावला आहे.