तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील मौल्यवान दागदागिने पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील मौल्यवान दागदागिने पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

तुळजाभवनी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडा प्रकरणी सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर बोलत होते.कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवस्थानचा खजाना व जामदार खान्यातील अति प्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या- चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार  व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य सीआडीमार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी २००१ ते २००५ या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा टाकून सात लाख १० हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम व दोन हजार किंमतीचा संगणक मॉनिटर चोरुन नेल्याप्रकरणी प्राप्त फिर्यादीवरुन ठाणे ग्रामीण पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून तीन लाख ७८ हजार आठशे सहा रुपये रोख रक्कम, दोन मोटार सायकली, हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.ज्यातील मंदीरे तसेच धार्मिक स्थळावरील चोऱ्या तसेच मौल्यवान मुर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षा रक्षकांची मागणी केल्यास त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलामार्फत ती पुरवली जाईल असेही केसरकर यांनी सांगितले.

Previous articleराज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही
Next articleगेल्या तीन वर्षात १२ हजार शेतक-यांच्या आत्महत्या