राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत, राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी शाळांमधील शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात, त्यांतर्गत राज्यातील  शाळाप्रवेशांची कार्यवाही येत्या ३१ जुलै पर्यंत पुर्ण करणार असल्याचेही  शेलार यांनी सांगितले.

 शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यात एकुण १ लाख १६ हजार ७७९ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी २ लाख ४४ हजार ९३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.  आतापर्यंत ५० हजार ५०५ बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित प्रक्रिया ३१ जुलै पर्यंत पुर्ण करण्यात येईल. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश देण्यात येईल असे शेलार यांनी सांगितले.

 शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये लागू झाला त्यावेळी शालेय स्तरावर प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर  २०१५-२०१६ पासून ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. या कायद्याअंतर्गत शासनामार्फत करण्यात येणा-या शुल्क प्रतिपुर्तीच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात १५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून  २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्के शुल्क प्रतिपुर्ती झाली असून सन २०१८-२०१९ साठीची शुल्क प्रतिपूर्ती करणे बाकी आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleआता देव सुद्धा या देवेंद्र सरकारला वाचवू शकणार नाही
Next articleतुळजाभवानी देवीच्या मंदिरातील मौल्यवान दागदागिने पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी