७२ हजार रिक्त पदांच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक : धनंजय मुंडे

७२ हजार रिक्त पदांच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील नोकऱ्यांमध्ये ७२ हजार पदेच उपलब्ध नसताना दोन वर्षात दीड लाख पदे भरण्याची घोषणा करुन सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी सरकारची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, दुष्काळ, सामाजिक आरक्षणे, यासह विविध समाज घटक आणि विदर्भ कोकणासह संपुर्ण राज्याचे प्रश्न मांडताना सरकारवर चौफेर हल्ला चढविला.

राज्य दुष्काळात होरपळत असून, त्याठिकाणी जावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असता तर बरे वाटले असते परंतु असे न करता निवडणुकीअगोदर मुख्यमंत्री रथयात्रा काढणार आहेत. तुम्ही स्वतःला राजा समजता का? अशा सवाल मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. पुलवामा हल्ल्याच्या निवडणूकीसाठी केलेला उपयोग, विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्यावर सरकार कसे अपयशी ठरले आहे याची चिरफाड केली.राज्याच्या अर्थसंकल्पातून लोकांचे भले झाले असते तर लोकसभेची निवडणूक तुम्ही अर्थसंकल्पातल्या निर्णयावर लढवली असती शहीद सैनिकांच्या मृत्यूवर लढवली नसती. पुलवामातील शहीद सैनिकांच्या आणि बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलेल्या जवानांच्या नावाने मते मागितली नसती. लोकसभेतील तुमचा विजय हा सरकारच्या कामगिरीवर नाही तर शहीद सैनिकांच्या कामगिरीचा विजय आहे असा आरोप मुंडे यांनी केला.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करु असे पाच वर्ष सांगत होतात. आजचा तुमचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तुमच्या सरकारची घटका भरली तरी मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आली नाही असा टोला  मुंडे यांनी लगावला.लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्राने शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. याचाच अर्थ महिन्याला ५०० रुपये तर ३० दिवसाचा महिना पकडला तर दिवसाला १६ रुपये ६० पैसे आणि एक कुटुंबात ५ माणसं धरली तर प्रत्येक माणसाला दिवसाला ३ रुपये ३० पैशांची मदत मिळणार आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. जगाचं पोट भरणाऱ्या शेतकर्‍यांच्या तोंडावर दिवसाला सव्वा तीन रुपये फेकून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे असा आरोपही मुंडे यांनी केला.३ वर्षात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली सरकारकडून दिली जाते. त्यावेळी प्रत्येक नागरीकाची मान खाली जाते. शिवरायांच्या महाराष्ट्रावर ही अवकळा आल्याची आम्हाला लाज वाटते. ती तुम्हाला का वाटत नाही असा प्रश्न मुंडे यांनी सरकारला केला.गेल्या ५ वर्षात धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. त्यांना हवं असलेले आरक्षण दिले नाही. आता पुन्हा निवडणूकीच्या तोंडावर १ हजार कोटींची गाजरं दाखवली आहे. त्यामुळे यापुढे धनगर बांधवांची फसवणूक चालणार नाही ती खपवूनही घेणार नाही असा इशाराही  मुंडे यांनी दिला.

मुंबईच्या अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही. सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा शिवरायांचा पुतळा उंच असेल असे आश्वासन आपण दिले होते त्याचे काय झाले असा सवाल करतानाच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचा विसर सरकारला पडला आहे. राज्यात एकही स्मारक उभं राहत नसताना स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. हे स्मारक तरी पूर्णत्वाला जाणार का याबाबत शंका असल्याचे स्पष्ट केले.  दोन वर्षात दीड लाख पदे भरणार त्यापूर्वी ७२ हजार पदांची मेगा भरती करणार अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेतील उत्तरात ४ हजार पदे भरल्याचे सांगितले. या वेगाने ही पदे भरण्यास १० ते १२ वर्षे लागतील. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षात कोणकोणत्या विभागाची एकुण किती पदे भरती व आज रोजीपर्यंत किती पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे याची माहिती द्यावी अशी मागणीही  मुंडे यांनी केली.

Previous articleविधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले
Next articleमराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन व्हावे : छगन भुजबळ