आमदार प्रवीण दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद 

आमदार प्रवीण दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद 

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघामध्ये जनसंपर्क अभियान जोरदारपणे सुरु केले आहे.काल शनिवारी सुरु झालेले हे अभियान दहा दिवस चालणार आहे. त्यामध्ये नागरिक आपल्या समस्या थेट आमदारांकडे मांडत आहेत. तर आमदारांकडून त्यावर तत्कालीन उपाययोजना तातडीने करण्यात येत असून दीर्घकालीन योजनेचे नियोजन आखले जात आहे. त्यामुळे या अभियानाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.  रोज शेकडो सदस्य नोंदणी आणि नवमतदार नोंदणीही होत आहे. एकंदरीत मागाठाणे क्षेत्रातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे.

‘भाजप सदस्य नोंदणी, नवमतदार जनजागृती आणि नोंदणी करणे, लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्यांना त्याचा लाभ मिळवून देणे,  स्थानिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे,’ या प्रमुख उद्धेशाने हे जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्यामध्ये मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील सात वॉर्डमध्ये सुमारे चाळीस ठिकाणी थेट जनसंपर्क साधला जात आहे, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. शनिवार दि. ६ जुलैपासून सुरु झालेल्या या अभियानामध्ये संभाजीनगर कांदिवली पूर्व, आंबेडकरनगर नरसीपाडा, आदर्श मित्र मंडळ, रावळपाडा, दहिसर पूर्व, तसेच अभ्यासिका रावळपाडा येथे जनतेशी संपर्क साधण्यात आला. या चारही ठिकाणी प्रचन्ड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने सदस्य होत आहेत. मतदार नोंदणीसाठीही अर्ज भरले जात आहेत.

या अभियानामध्ये शौचालये, गटारे, पाणीप्रश्न याबाबत बहुतांशी तक्रारी येत आहेत.  तर नरसीपाड्यात अभ्यासिकेची मागणी झाली. संभाजीनगर येथे ड्रेनेज लाईन नीट करणे, तर आंबेडकर नगर येथे बेरोजगार तरुण, मोलकरीण, चर्मचार तसेच महिला व मागासवर्गीय समाजाने रोजगाराची मागणी  केली. येथील तरुण मुले मोठ्याप्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे तेथील मुलांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करणे, तसेच कोणतेही गैरकृत्य होऊ नये यासाठी परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिले.

तसेच विधवा महिला व जेष्ठ नागरिक यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, याचीही मागणी झाली. तसेच एसआरएचे प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी एसआरएच्या रखडलेल्या इमारती मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांची आहे. अशा विविध मागण्यांवर आमदार प्रवीण दरेकर यांनी समर्पक उत्तरे दिली. आपला आमदार निधी आणि शासनाच्या माध्यमातून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गरिबांसाठी अनेक योजना, तसेच, युवा, महिला, जेष्ठ नागरिक, नोकरदार कर्मचारी यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केल्याचे सांगितले. तसेच निराधार व विधवांना अनुदानात ६०० रुपयांवरून एक हजार वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती या सर्व दौऱ्यात प्रवीण दरेकर यांनी  नागरिकांना दिली.यावेळी श्री माता गोलपा देवी मंदिर – वाघरी सर्वोदय समाज मंच, संभाजीनगर, रमाबाई एकता मित्र मंडळ, नरसीपाडा, संभाजीनगर सार्वजनिक श्री दत्त गुरु मंडळ, संभाजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था, भूमी लिजंड हौसिंग सोसायटी, सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ राऊळपाडा या संस्थांनी परिसरातील विविध समस्यांबाबत आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदने दिली.

Previous articleराष्ट्रवादाप्रमाणेच ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था ही अफूची गोळीच
Next articleसोफीटेल हॉटेलच्या बाहेर युवक काँग्रेसची निदर्शने