मुंबई नगरी टीम
मुंबई : अनेक अभिनेते,राजकारणी,मोठ्या व्यक्ती यांचे समाज माध्यमात असणा-या अकाउंट मध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्यात येतात.या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अनेक बड्या व्यक्ती,अभिनेते आणि राजकारणी यांच्या समाज माध्यमात असणा-या अकाउंट मध्ये जनसंपर्क कंपन्यांकडून बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्यात येतात.त्यामुळे अशा बनावट फॉलोअर्सचा उपयोग हा ट्रोलिंगसाठी करण्यात येत असल्याने अनेक वादांना तोंड फुटत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच प्रमाणे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डाटा चोरीसाठी याचा उपयोग केला जात असल्याने या बनावट फॉलोअर्स प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलीसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे,अनेक समाज माध्यमात असणारे बनावट फॉलोअर्स आणि असे बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देणा-या जनसंपर्क कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
फेसबुक, ट्विटर आणि समाज माध्यमात अनेक बडे व्यक्ती, राजकारणी, अभिनेते यांचे अकाउंट आहेत. त्यामध्ये काहींचे कोटी मध्ये तर काहींचे लाखाच्या घरात फॉलोअर्स आहेत.काही लोक आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी जनसंपर्क कंपन्यांचा आधार घेत असल्याचे समोर आले आहे.काही रक्कम मोजून लाखांच्या संख्येत बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देण्याचे काम अशा जनसंपर्क कंपनीकडून करण्यात येते.गेल्या काही दिवसात अभिनेते आणि राजकीय व्यक्तीना व्यक्त केलेल्या मतांवर बनावट फॉलोअर्स तुटून पडत मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे.अशा प्रकारामुळे अनेक वाद निर्माण होत असल्याने बनावट फॉलोअर्स उपलब्ध करून देणा-या कंपनी आणि असे बनावट फॉलोअर्सचा आधार घेणा-या व्यक्ती या सर्व प्रकणाची चौकशी पोलीसांमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.