एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोतांचा हिस्सा किती ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? कशाच्या आधारे ही वसुली केली? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, हजारो एस. टी. कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात पाच महिने आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार या कामगारांच्या पाठीशी पहिल्यापासून खंबीरपणे उभे होते, पगारवाढीसह त्यांच्या इतर मागण्याही मान्य केल्या आहेत. परंतु यादरम्यान कामगारांकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतले गेल्याचे उघड झाले आहे. काही एस. टी. कामगारांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोन्ही आमदारांना या वसुलीतील हिस्सा मिळाला का? कोणत्या आधारे त्यांनी ही वसुली केली ? या वसुलीतील वाटपावरूनच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांचे वकील सदावर्ते गुणरत्ने यांच्याशी वाद होऊन बाहेर पडावे लागले का, याचा खुलासा झाला पाहीजे असे लोंढे म्हणाले.

पडळकर – खोतांचा ‘त्या’ पैशात वाटा आहे का ? याचा तपास यंत्रणेने करावा – महेश तपासे

भाजपचे विद्यमान आमदार पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते त्यामुळे सदावर्तेने जमा केलेल्या पैशामध्ये या दोघांचा वाटा आहे का? याचाही तपास यंत्रणेने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

सदावर्ते यांनी कामगारांकडून सुरुवातीला ५३० आणि नंतर ३०० रुपये जमा केले असा युक्तिवाद न्यायालयात झाला आहे. जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असतील तर या पैशांचा आकडा फार मोठा होतो. रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कमटॅक्सच्यादृष्टीने गुन्हा आहे असेही महेश तपासे म्हणाले.महामंडळाचे विलिनीकरण व्हावे याला कोर्टाने मान्यता दिली नाही. त्यामुळे पाच महिने कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. हे आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि याला भाजपने समर्थन दिले होते याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

Previous articleमुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळेच कारवाई,अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा,सगळे कारस्थान बाहेर येईल
Next articleबलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करा