वाचा : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

मुंबई नगरी टीम

नांदेड महापौर,उप महापौर पदाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या

मुंबई : नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उप महापौर पदाच्या निवडणुकांसाठी पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यास व या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उप महापौर पदाचा प्रचलित अडीच वर्षाचा पदावधी दिनांक १ मे २०२० मध्ये संपुष्टात येत असल्याने व कोरोना विषाणुमुळे उद्भभवलेल्या आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीमुळे तेथे निवडणूका घेणे शक्य नसल्याने महापौर,उपमहापौर यांच्या निवडणूका कोवरोनाच्या संक्रमणामुळे ३ महिने पुढे ढकलणे व विद्यमान महापौर/उपमहापौरांना मुदतवाढ देणे यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.हा अध्यादेश २७ मार्च २०२० पासून अंमलात आला असून, ३ महिन्यांच्या कालावधीकरीता म्हणजेच २७ जुलै पर्यंत सदर मुदतवाढ लागू आहे. उपरोक्त अध्यादेशाव्दारे दिलेली मुदतवाढ २७ जुलै रोजी संपत असल्याने, तसेच अद्यापही राज्यामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव कायम असल्याने, महापौर निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने सदर अध्यादेशाव्दारे दिलेली मुदतवाढ पुढील ३ महिन्यांसाठी वाढविण्यास्तव अध्यादेशात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली.

सहकारी संस्थांचे लेखा परिक्षण,वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा कालावधी वाढविला

मुंबई : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील  विविध कलमात  सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परिक्षणास मुदतवाढ देण्याची सुधारणा करण्यात येईल.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम २७ मधील तरतुदीनुसार  संस्थेच्या क्रियाशील सभासदांनाच संस्थेच्या निवडणूकीमध्ये मतदान करता येते. संस्थेचा क्रियाशील सभासद होण्यासाठी, काही किमान सेवा घेणे व ५ वर्षातून किमान एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे कलम ७५ मधील तरतूदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑक्टोंबर पर्यत घेणे शक्य नसल्याने  संस्थांमधील सभासद अक्रियाशील  होवून भविष्यात संस्थेच्या होणाऱ्या निवडणूकीत  ते मतदार यादीतून वगळले जावून,  मतदानापासून वंचित राहू शकतात. हे टाळण्यासाठी कलम २७ मध्ये सुधारणा करण्यास व सर्वसाधारण सभा घेण्याचा कालावधी वाढविण्यासाठी  कलम ७५ मध्ये अशी सभा घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत  सुधारणा करण्यास मान्यता देण्यात  आली आहे.

तसेच कलम ८१ मधील तरतुदीनुसार प्रत्येक संस्थेला  वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून ४ महिन्यांच्या कालावधीत आपले लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे.  मात्र, सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे  लेखापरिक्षण अहवाल  ३१ जुलै पूर्वी सादर करणे शक्य नसल्याने कलम ८१ चे पोट-कलम १ मध्ये लेखापरिक्षण अहवाल सादर करण्याच्या कालावधीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ करण्यासाठी उक्त कलमात  सुधारणा करण्यास मान्यत देण्यात  आली आहे.कोरोनाच्या या साथ रोगामुळे २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या गृह निर्माण संस्थांची पाच वर्षाची मुदत संपली असेल, अशा संस्थांवरील  समिती सदस्य नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत नियमितपणे  सदस्य म्हणून कायम राहाण्यासाठी तरतुद करण्यास मान्यता देण्यात आली.

सुपारी व नारळाच्या झाडांना वाढीव दराने मदत

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना   विशेष बाब म्हणून   प्रति झाडाप्रमाणे  वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे  रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी  सुपारी व नारळाच्या झाडांना  प्रति हेक्टरी रू ५० हजार या दराने मदत देण्याऐवजी  पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति झाड प्रमाणे खालील दराने मदत  देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.  सुपारी – रू  ५० संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठ नारळ   – रू. २५० संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी वरील दराने मदत देण्यासाठी होणारा संपुर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्यात गेल्या १० वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यात ११,०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोरोनाच्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण १४९.९३ क्विंटल कापूस खरेदी केली.कोरोनाच्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यसामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोरोनाच्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

Previous articleमोठा निर्णय : “या” शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट
Next articleदणका : समाज माध्यमावरील फेक फॉलोअर्स प्रकरणाची चौकशी होणार