पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा इशारा मोर्चा
मुंबई नगरी टीम
मुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्यांची नावे बँकेच्या दारावर लावता त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावेही बँकांच्या दारांवर लावण्यात यावी असा इशारा देतानाच शेतकऱ्यांसाठी शिवसेना येत्या बुधवारी १७ जूलै रोजी पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे अशी घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येते केली . “हा शेतक-यांचा मोर्चा नसेल तर हा शेतक-यांसाठी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हि घोषणा केली.मुंबईत वांद्रे येथील संकुलातील एका कंपनीविरोधात हा प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात येणार आहे.इतर कंपन्यांकडे शिवसेनेची शिष्टमंडळे जातील असे ठाकरे म्हणाले. कर्जमाफी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे बँकांनी फलकावर लावली पाहिजे काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आपण करीत आहोत असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. झारीतले शुक्राचार्य कुणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल . शेतकऱ्यांना जर कुणी नाडले तर धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगतानाच, विमा कंपन्यांना सरकारी भाषा समजत नसेल तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समाजावून सांगेल, अशा इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्याने काम करत असून, दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्यांना प्रसाद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत सुरू आहेच. त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना व्हावा यासाठी शिवसेना कायम प्रयत्नशील आहे. पीक विमा योजनेसंदर्भात शिवसेनेने अशीच ठाम भूमिका घेतली आहे. सरकार बदलल्यानंतर कर्जमाफी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना या चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगत ठाकरे यांनी योजनांचे कौतुक केले. मात्र सरकार बदलले असले तरी यंत्रणामात्र तीच आहे. या यंत्रणेला जागे करावे लागते. म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी मुंबईत हा इशारा मोर्चा काढणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.सरकारी पातळीवरही आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आम्ही देखील आपल्यापरीने प्रयत्न करत आहोत. पीक विमा देणाऱ्या कंपन्यांना आम्ही ही प्रेमाची सूचना करत आहोत, असेही ते म्हणाले.