आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री १५० मतदार संघ पिंजून काढणार

आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री १५० मतदार संघ पिंजून काढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोंबर महिन्यात होण्याची शक्यता असून, आचारसंहिता घोषित झाल्यानंतर राज्यातील राजकीय पक्ष आपल्या प्रचारास सुरूवात करणार असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने १५० मतदार संघ पिंजून काढणार आहेत. या यात्रेदरम्यान  दरम्यान ८७ मोठ्या सभा व  ५७ स्वागत  सभा होणार आहेत. महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून  १ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून  सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिकयेथे होणार आहे.

शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची वातावरण निर्मिती केली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी महाजनादेश यात्रा काढणार असून, सुमारे महिनाभर चालणा-या यात्रेच्या निमित्ताने ते आचारसंहितेपूर्वीच विधानसभेचे १५० मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून  १ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून  सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून, या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.  यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत  सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक  गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी  भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या-ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या-त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भाजपाचा बालेकिल्ला असणा-या विदर्भात १ हजार २३२ किलोमीटर तर  एकूण ४४ मतदारसंघात हि यात्रा फिरणार आहे.उत्तर महाराष्ट्रात ६३३ किलोमीटर  म्हणजेच ३४ मतदारसंघात मुख्यमंत्री या यात्रेच्या निमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये जावून सरकारची कामगिरी सांगणार आहेत.मराठवाडात १ हजार ६९ किलोमीटर  म्गणजे २८ मतदारसंघात तर पश्चिम महाराष्ट्रातील ८१२ किलोमीटर  व २९ मतदारसंघात हि यात्रा प्रवास करणार आहे. कोकणात  ६३८ किलोमीटर प्रवास करताना  कोकणातील १५ मतदारसंघ मुख्यमंत्री पिंजून काढणार आहेत.

Previous articleनवे  मनोरा आमदार निवास असणार ३४ मजल्यांचे
Next articleग्रामीण भागातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा